"चला करू लसिकरण,बांधू स्वरक्षणाचं तोरण."

 "चला करू लसिकरण

बांधू स्वरक्षणाचं तोरण."

समदं जग कोरोणाच्या महामरीत होरपळून निघालं. कित्येक उद्योगधंदे बुडाले,कामगारांच्या हातची कामं गेली,पैशाविना कित्येक्कांना केवळ पाण्याच्या घोटावर दिवसं काढावे लागले.काहिंच्या नशिबाला तर पाणी सुद्धा लाभलं नाही.लाखो मजूर बेघर होवून घराच्या शोधात वनवन भटकले.भाकरिचा चंद्र अनं घराची सावली शोधता शोधता असंख्य लाचारांनी रस्त्यावरच भटक्या कुत्र्यां सारखा जीव सोडला.कमाईला गेलेल्या बापाची चातका सारखी वाट पाहता पाहता कुटीतल्या कळ्या उमलण्या अगोदरच कोमेजून गेल्या.अर्धपोषणानं कपाळाच्या खोबणीत जाऊन बसलेले डोळे कमाईस बाहेर गेलेल्या कमावत्याची वाट पाहता पाहता कायमचे विसावले.विद्यार्थ्यांचे शिक्षण,तरूणांचे लग्न, पारावरच्या बैठका, सनावारांची धामधुमी ,फुललेल्या बाजारपेठा,कारखाण्याची घरघर, शाळेतील विद्यार्थ्यांचा किलबिलाट ,आऊनचारपाऊनचार ,......सारं काही कोरोणानं हिसकावून घेतलं.कदाचीत विश्वातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या हाणी पैकी ही हाणी मोठी असावी असे वाटते.

स्वयंसेवी संस्था,विविध सामाजिक संघटना,आरोग्यावर काम करणाऱ्या विविध शाखा,पोलिस यंत्रणा, डॉक्टर,परिचारीका रात्रंदिवस कोरोणाला नियंत्रित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन  सारे मेथाकुटीस आले.शासनाने विविध उपाययोजना करून कोरोणावर थोड्याफार प्रमाणात नियंत्रण मिळविले.सा-यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले.पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होवू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आता आपली आहे.आपल्या लाडक्या कुटुंबातआपले म्हातारे जन्मदाते , सुखदुःखाच्या पाऊलवाटेवर सावली बनून चालणारी आपली प्राणप्रिय पत्नी,काळजाचा तुकडा असलेले आपले अंश ह्यांच्या आरोग्याची साहाजिकच जबाबदारी आपली.तर मग सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्या मित्रपरिवारास , शेजा-यास लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त करुया.कदाचीत आपल्या प्रयत्नां मुळे आज थांबलेला देश पुन्हा नव्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायला लागेल .                   

               बंदुकधारी सैनिक बनून देश रक्षणाचं कार्य करण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभलं नाही.परंतू कोरोणा रूपी घुसखोरास आपण आपल्या प्रयत्नांनं हद्दपार करून देशसेवा करु शकतो व खरा भारतीय असल्याचे सिद्ध होवू शकतो.कदाचीत आपल्या एका प्रयत्नाने नुकतीच शाळेच्या उंबरठ्यावर आलेली चिमुकल्यांची पावलं पुन्हा शाळेची वाट चालू शकतील..

                                                  लेखक-विनोद तात्याजी मडावी, जामणी